द.ग.तटकरे महाविद्यालय तळाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर यावर्षी वाशी हवेली गावात..

द.ग.तटकरे महाविद्यालय तळाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर यावर्षी वाशी हवेली गावात..
दैनिक युवक आधार
तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी श्रमदान शिबीर यावर्षी वाशी हवेली या आदर्श गावात ४ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे, या निमित्ताने ग्रामस्थ व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि प्राध्यापक वर्ग यांची नुकतीच बैठक पार पडली. या संपूर्ण सात दिवसांमध्ये ‘युथ फॉर माय भारत आणि डिजीटल लिटरसी’ या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरुन विविध तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी स्वयंसेवकाना श्रमप्रतिष्ठा कळावी यासाठी श्रमदानातून विविध कामे हाती घेणार असल्याचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्ता कुंटेवाड आणि प्रा.भरत चाळके यांनी सांगितले.वाशी हवेली गावचे माजी सरपंच श्री.जगन्नाथ तांडेल यांनी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाला पुरेपूर सहकार्य करण्याचे आश्वासन देत शिबीरासाठी वाशी हवेली गावाची निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले. एका उच्च शिक्षित तरुणाने मुंबईची वाट न धरता ग्रामविकासाचा घेतलेला वसा आणि त्यांना असणारी ग्रामस्थांची साथ यामुळे वाशी गाव नेहमी चर्चेत राहिले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील हिवरे बाजार म्हणून वाशी हवेली या गावाकडे पाहिले जात आहे. आणि तळा तालुक्यातील प्रत्येक तरुणाने या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे म्हणून विद्यार्थी वर्गामध्ये या गावाला भेट देण्यासाठी उत्सुकता आहे.



