“स्वच्छता गावाची आरोग्याच्या गुरुमंत्राची” उपक्रमाचा शुभारंभ!
संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा वसा सांभाळला केळवणे गावातील तरुणांनी;

“स्वच्छता गावाची आरोग्याच्या गुरुमंत्राची” उपक्रमाचा शुभारंभ!
संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा वसा सांभाळला केळवणे गावातील तरुणांनी;
दैनिक युवक आधार
उरण शहर प्रतिनिधी/सायली साळुंके
“आपले गाव आपली जबाबदारी” या विचाराने केळवणे गावातील काही युवकांनी एकत्र येऊन स्वछतेचे अभियान आपल्याच केळवणे गावात सुरु करण्याचा विचार करून “स्वच्छता गावाची आरोग्याच्या गुरुमंत्राची” उपक्रमाचा शुभारंभ दीपावलीच्या शुभमुहुर्तावर केला,युवकांच्या स्वच्छतेच्या उपक्रमाची दखल गाव स्वच्छते साठी प्रयत्नशील असणारे केळवणे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घेऊन स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व युवकांचे कौतुक केले आहे.
या उपक्रमात तरुणांनी पत्रकार अजय शिवकर यांच्या मार्गदर्शना खाली आणि ग्रामपंचायत केळवणे यांच्या सहकार्याने स्वछता मोहीम राबवून गावाच्या प्रवेशव्दारा जवळील रस्त्याची साफसफाई करून कचरा जमा करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून सर्वाना आरोग्याचा संदेश दिला आहे.या उपक्रमात विजय ठाकूर, प्रणय मोकल,सागर मोकल,आदेश ठाकूर,साईराज पाटील,एम. के.कोळी,ब्लॉगर सागर पाटील ,शुभम पाटील,सर्वेश पाटील,सार्थक पाटील या तरुणांनी सहभाग घेतला होता, स्वच्छता उपक्रमात संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता मोहिमेच्या कार्याचा सन्मान ठेवून त्याच्या कार्याचा वसा गाव स्वच्छ व सुंदर बनविण्या साठीं या तरुणांनी स्वच्छतेची शपथ घेतली आहे. वशेणी गावचे शिक्षक तथा साहित्यिक म. का. म्हात्रे गुरुजी यांनी या युवकांचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमात सक्रिय सहभाग दाखवून हातभार लावला,यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अनंत माळी यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. सर्व स्तरातून या तरुणांचे कौतुक केले जात आहे.



